मरहट्ट्यांच्या तख्तावरती हा उभा रांगडा मर्द गडी
ओंजळीत जपलेली कडेकपाऱ्यांची शिदोरी हा आपल्या डोक्यावर मिरवतो.
कुशीत निजलेल्या निसर्गरंगाची उधळण करून हा कातळकडे सजवतो.
असा लोभसवाणा रूपड्याचा सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.
तो खेळतो दऱ्याखोऱ्यात, वाऱ्याची शीळ होऊन बागडतो.
धडपडताना पायावरची हलकीशी जखम होऊन जातो.
कधी नदीपात्रात डुंबतो एका शुभ्र कातळासारखा
तर कधी उंच कडेलोटावर तो वाऱ्यालाही पुकारतो.
सांभाळतो एखादा बाप जसा आपल्या नवजात पिलाला मायेने
तसा हा अखंड सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.
ठेचाळतो ह्याच्याच अंगाखांद्यावर, मात्र पडायची भीती वाटत नाही.
पडलो तरी सराईतपणे उभी राहण्याची हिम्मत तो देतो.
सुवेळाच्या सूर्यास्तात तो ही दंग होतो
तर कधी नेढ्याच्या थंडाव्यात तो ही दोन घटका विसावतो.
एखाद्या निसरड्या वाटेवर सावरतो तो हलकेच तोल
असा हा अजस्त्र सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.
छत्रपतींच्या कर्तबगारीचा एकमेव साक्षीदार तो
ती पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या रगारगात जो वागवतो.
घडवतो असे लाखो मावळे ह्या शतकोत्तर प्रणालीच्या वारसदारीसाठी
अशा ज्याच्या रूपापुढे दिल्लीचा तख्तही धजावतो.
तो महाराष्ट्राचा सह्याद्री आम्हांला आमच्या बापाप्रमाणे जपतो.
- जान्हवी फुलवरे.