Thursday, February 6, 2020

हरिश्चंद्रगड - भटक्यांची पंढरी.




गेल्या वर्षभरात मोरया ट्रेकर्ससोबत अनेक ट्रेक केले. पण " हरिश्चंद्रासारखा ट्रेक झालाच नाही, हेच वाक्य सतत कानांवर पडत आलंय. त्यामुळे मनात उत्कंठा होती हरिश्चंद्रगडाला जाणून घ्यायची आणि तो अतिभव्य कोकणकडा नजरेत सामवून घेण्याची. गेल्या वर्षभरापासूनची ही इच्छा मात्र आज पूर्ण होणार होती.
  नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर अनेक डोंगररांगा आहेत. अगदी रतनगडापासून अलंग-मदन-कुलंग, सांधणदरी, माळशेज घाट ही ठिकाणंसुध्दा ह्याच पर्वतरांगांमध्ये येतात. ह्याच सर्व डोंगररांगांमध्ये अगदी अलिप्त पण अभेद्य असा कोकणकडा स्वतःच्या उराशी बाळगून उभा असलेला हा ' हरिश्चंद्रगड '. आणि ही मुसाफिरी आहे सह्याद्रीची संजीवनी असलेल्या त्याच हरिश्चंद्रगडाची.
दिवस होता ७ जून शुक्रवार. नेहमीप्रमाणे रात्री कसारा जाणारी शेवटची गाडी पकडली आणि मजल दरमजल करत रात्री १२:३० वाजता कसारा स्टेशनला पोहोचलो. ८ तारीख उजाडली होतीसुद्धा. या ८ जूनचं विशेष असं की मोरया ट्रेकर्सला बाप्पाच्या आशीर्वादाने १ वर्ष पूर्ण झालं होतं. आनंद अनावर होता. उत्साह अफाट होता. त्यामुळे स्टेशनवर केक कापून मोरयाचा पहिला - वहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवातच खूप सुंदर झाली. पण त्यामुळे पुढच्या प्रवासाला उशीर करून चालणार नव्हता. त्यामुळे सगळा कार्यक्रम आटोपता घेत आम्ही गाड्यांकडे जायला निघालो. शंकरदादा कधीपासून आमचीच वाट बघत होता. हा शंकरदादा म्हणजे मोरया कुटुंबातील अगदी विश्वासाचा माणूस. वेळेचं महत्त्व जाणणारा आणि त्यामुळेच आतापर्यंत शंकरदादाच्या गाड्यांमुळे कुठल्याही ट्रेकला आम्हाला कधीच उशीर झाला नाही.
      गणपती बाप्पा म्हणत चारही गाड्या सुरू झाल्या. नेहमीप्रमाणे बाबाच्या धाब्यावर थांबलो. थोडावेळ पाय मोकळे झाले. चहाच्या प्रत्येक घोटासोबत हरिश्चंद्र डोळ्यासमोर येत होता.
     प्रवास साडेतीन-चार तासांचा होता. दिवसभराचा थकवा थोडा जाणवत होता. झोप डोळ्यांना झोपवत होती. पण गाडीतला कल्ला झोपून देईल तर खरं!! मोठमोठ्याने लावलेली गाणी आणि गाडीबाहेरचं वातावरण ह्यांत गप्पा रंगून चार तास निघून गेले, कळलंही नाही. प्रत्येक घाट वळणातून गाडी रास्ता काढत चालू होती. गाडीचे दिवे बंद करता वाटेत मध्येच एखाद झाड काजव्यांनी कब्जा केलेलं दिसत होतं. मध्येच शंकरदादा गाडीचे दिवे बंद करून आम्हाला काजवे दाखवत होता. अहाहा!!! जणू आकाशातले सर्व तारे त्या एकाच झाडावर तोडून ठेवले आहेत.
     साधारण साडेतीन-चार वाजता आम्ही पाचनई गावात पोहचलो. पाचनई गावात थोड्या आतल्या वळसाला भास्कर दादाचं घर होतं. त्या घरापाशी सगळ्या गाड्या थांबल्या. लगेचच ट्रेकला सुरुवात करायची होती. सगळ्यांची थोडी आवराआवर सुरू झाली. तरीही पहाट उजाडायला सुरुवात झालीच. साडेपाच वाजता ट्रेक सुरू झाला. सर्व चेहरे अनोळखी पण तरीही प्रत्येकाच्या मनात असणारी हरिश्चंद्राची ओढ मात्र एकच होती. वाहणारी ती थंड हवेची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्श करून जात होती. तर मध्येच थंडी अंगावर शहारे आणत होती. जोश, उत्साह तसाच कायम होता. प्रत्येकाची पाऊलं आणि मनातली ओढ हरिश्चंद्रच्या दिशेनं चालू लागली.
      थोडा वेळ चालल्यानंतर पुढचा रस्ता हा डोंगराच्या कपारीतून जात होता. त्या कपारीतून चालत पुढे जातानाच समोर दिसणारी हिरवी गर्द झाडी भुरळ पाडत होती. भले मोठे उंच डोंगर आणि हिरवी दाट झाडी त्यामुळे त्या कपारीत मोठ्याने ओरडण्याचा मोह काही आम्हाला आवरला नाही. त्यामुळे ‘गणपती बाप्पा मोरयाsss’अशी हरिश्चंद्रावरून बाप्पाला साद घालता आम्हाला आमचाच प्रतिध्वनी (echo) ऐकू आला. खूप छान वाटलं. पण वेळेचं भान राखून  पुन्हा त्या कपारीतून  चालू लागलो.
     रस्ता मध्येच पुन्हा अरुंद होत होता. मध्येच झाडांची गर्द सावली आराम देत होती.तर मध्येच कोवळी सूर्यकिरणं चेहऱ्यावर मारा करत होती. शेवटी मजल-दरमजल करत एक पठारावर पोहचलो.थकवा जाणवू नये म्हणून लहानपणी पाहिलेल्या कार्टून्सची गाणी गात होतो.म्हटल तेवढाच टाईमपास.थोडं अजून वर चालत गेलो.चालण्याच्या गतीमुळे काहीजण पुढे होते तर काही अगदीच मागे. आम्ही ते मागच्या टोळीतलेच एक. पण शेवटी एक झेंडा त्या पठारावर फडकताना आम्हाला दिसला. उत्सुकता इतकी शिगेला पोहचली की धावत जाऊन वर गेलो. पाहतो तर समोर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर होत.गडावर पोहचल्याचा आनंद आणि महादेवाचं मंदिर पाहिल्याचं समाधान अशी दुथडी भावना मनात येत होती पण तरीही आम्ही काहीजणं समोरच्या पडवीत जरा वेळ थांबलो. लिंबू सरबताने थंडावा आणि आराम दिला. थोडा थकवा आला होता पण मन शांत बसून देत नव्हतं कारण अजूनही कोकणकड्याचं दर्शन अजून बाकी होतं.
     पुन्हा चालायला लागलो. हरिश्चंद्रेश्वराच्या डाव्या बाजूलाच सप्ततीर्थ पुष्करणी  आणि उजव्या बाजूला केदारेश्वराची गुहा आहे. त्याच गुहांच्या मागच्या बाजूने वरच्या दिशेला एक पायवाट पुढे कोकणकड्यावर जाते. आता थकवा पार निघून गेलेला कारण मनातली उत्सुकता एका जागी थांबून देत नव्हती.
  त्याच पायवाटेने पटापट पाऊलं उचलत आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. जसजसे पुढे जात होतो तसतसे खाली उतरलेले ढग दिसू लागले. जणू काही कापसाचा एक मोठा बोळाच कोणीतरी आकाशात सोडून दिलाय. शेवटी कोकणकड्याची एक बाजू दिसू लागली. त्या क्षणी मी पायाला भिंगरी मारल्यागत धावत सुटले. ट्रेकला पुढे गेलेले सर्वजण आधीपासूनच कोकणकड्यावर जाऊन ढग-सावल्यांचा खेळ बघत होते. काही जण निवांत नाश्ता करत बसलेले. मी सामान तिथेच ठेवलं आणि कोकणकड्याकडे सुसाट पळत सुटले. आणि...
 आणि शेवटी ते कोकणकड्याचं भव्य रुप साक्षात डोळ्यांसमोर उभं होतं. तो घोंघावणारा वारा, दूरवर पसरलेली ढगांची चादर पण त्यातही निरखून दिसणारी कोकणकड्याची प्रत्येक कडेकपार अंगावर काटा आणत होती. समोरचं सगळं दृश्य डोळ्यांत साठवून घ्यायचं होतं. दूरवर पसरलेले कातळकडे आणि त्यांवर ढगांनी पांघरलेली शाल माझी नजर एकटक बळकावून होते. आनंद ओठी उमटत नव्हता कारण ते सुख जगापलीकडचं होतं.
  तिथे कड्यावरच नथुबाबाची झोपडी आहे. अहो झोपडी कसली, त्या घराच्या प्रत्येक भिंतीला प्रेमाची ऊब आहे. त्यांच्या जेवणाला आपुलकीचा गंध आहे. जागा जरी छोटी असली तरीही माया मात्र अफाट आहे. अशा या नथुबाबाकडेच आमचा दोन दिवसांचा खाण्यापिण्याचा मुक्काम होता. दुपारच्या जेवणाला बराच अवकाश होता त्यामुळे गरमागरम पोहे आणि चहा ह्याचा सगळ्यानी आस्वाद घेतला. जेवण होईपर्यंत पुन्हा हरिश्चंद्रेश्वर - केदारेश्वरला जायचं ठरलं. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर हे शालिवाहन काळातील आहे, असे मानले जाते. ह्या मंदिराच्या आजूबाजूला एकूण नऊ गुहा आहेत. त्यातली सर्वात प्रशस्त गुहा म्हणजे 'केदारेश्वरची गुहा'. ह्या गुहेत असणाऱ्या पाण्यातील शिवलिंगामुळे ह्या गुहेला महत्त्व प्राप्त झाले आहे. हरिश्चंद्रेश्वराच्या अतिडावीकडे काही गुहा आहेत. गडावर येणारी माणसं तिथे मुक्कामाला असतात. पावसाळ्यात तर ह्याच गुहा प्रत्येक गिर्यारोहकाला आसरा देतात. आजूबाजूचा परिसर आल्हाददायक होता. मंदिराच्या भिंतीच्या डाव्या बाजूला लागून गणपती बाप्पाची मूर्ती आहे. त्याच निमित्ताने बाप्पाची आरती करायची ठरली. संपूर्ण परिसर दुमदुमून उठला. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात जिवंत झरे आहेत. त्या गुहांमध्ये उतरुन प्रत्येकाने पाण्याची तहान पूर्णपणे भागवली. 
 आता सूर्य डोक्यावर आला होता. उन्हंसुध्दा तापू लागली होती. त्यामुळे आम्ही थोड्यावेळ हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या अतिडावीकडे असणाऱ्या गुहांमध्ये गेलो. त्या गुहा अगदी थंडगार आणि प्रशस्त होत्या. त्यामुळे तापत्या उन्हात विश्राम देण्याचं काम ह्या गुहांनी केलं. तिथेच गप्पा रंगल्या. अखंड बडबड आणि दमशेरासचा आवाज त्या गुहेत घुमत होता. थोड्यावेळानंतर सगळ्यांना कडकडून भुका लागल्या. त्यामुळे आम्ही आमचा गुहेतला मुक्काम  कड्याकडे वळवला. नथुबाबाच्या घराकडे परतलो. पोटात अक्षरशः कावळे कोकलत होते. जेवणाच्या पंगती घरातच बसणार होत्या. घरात शिरताच झणझणीत पिठलं आणि गरमागरम भाकरीचा खमंग वास दरवळत होता. सोबतीला चटणी होतीच. काहीजणांसाठी हा बेत अगदी नवीन होता. तरीही मिटक्या मारत सर्वांनी पिठलं भाकरीवर ताव मारला. पण नथुबाबाच्या आपुलकीने जास्त पोट भरलं. जेवण आवरल्यानंतर सर्वांनी अगदी ताणून दिली. चांगले २-३ तास बरं का! सायंकाळी कड्यावर थंडगार वारा वाहत होता. एकूणच तो सूर्यास्त आणि कड्यावरचं वातावरण पाहता मन अगदी विसावलं. कुठूनतरी आकाशात पक्ष्यांचा थवा दिसत होता. सूर्यसुध्दा मावळतीला आला होता. आकाशात निसर्गाने रंगाची जणू उधळणच केली होती. हळूहळू सूर्य कोकणकड्यामागे अस्ताला जात होता आणि ते रंग आम्ही फक्त आमच्या डोळ्यात साठवत होतो. 

 आता कोकणकड्यावर Camping म्हटलं तर टेंट आलेच. सूर्यास्तापर्यंत सगळ्यांचे टेंट लावून झाले होते. हळूहळू अंधारदेखील पडू लागला होता. Campfire तर करायचीच होती. त्यामुळे पारस, राकेश, मीत, हर्ष, राज आणि अजून काहीजणं ही टोळी जय श्रीराम म्हणत लाकडं शोधायला निघाली. दुपारच्या जेवणानंतर बराच वेळ उलटून गेलेला. त्यामुळे घशाला पाण्याची कोरड जाणवत होती. पण पाणी आणावं कुठून ? हा प्रश्न. पण लगेचच " बाकी जणं लाकडं आणेपर्यंत आम्ही जाऊन पाणी घेऊन येतो " असं बोलून अक्षय, सोनिया, सचिन, गौरव पाणी आणण्यासाठी हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे उतार झाले. ह्याच चार जणांमुळे ३५ जणांची त्या रात्री पाण्याची सोय झाली, ही गोष्ट कायम स्मरणात राहील.

सगळेजण परतले. Campfire लागायची फक्त बाकी होती. पण त्याआधी सर्वांनी जेवण उरकून घ्यायचं ठरलं. मग काय ! एकेक पंगत नथुबाबाच्या झोपडीत जाऊन जेवायला बसली. समोर पानं वाढायला घेतली. जेवण सुग्रासच असणार ह्याची खात्री होती आणि ते खरं ठरलंसुध्दा. पहिला घास तोंडात टाकताच " अहाहा " हीच प्रतिक्रिया उमटली. त्या भाजीची तर चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळतेय. सगळं उरकल्यावर सगळ्या पंगती उठल्या. पुन्हा टेंट्सपाशी आलो.  Campfire लागली आणि मग खरी धमाल सुरू झाली. अंताक्षरी रंगली, भुतांच्या गोष्टी अवतरू लागल्या आणि केवल, हर्षने सगळ्यांना कमाल गरबादेखील शिकवला. सगळ्यांचा पोटोबा छानपैकी झाला होता. त्यामुळे उत्साह दुपटीने वाढला होता. पण आमच्यात अशी एक व्यक्ती होती जिचा उत्साह आजच्या तरुण पिढीला लाजवेल असा होता. ती व्यक्ती म्हणजे सौ. सुरेखा मांजरेकर ऊर्फ आमच्या लाडक्या काकू. संपूर्ण ट्रेकमध्ये काकू जणू आमची आईच झाली होती. अफाट माया आणि तितकीच काळजीसुध्दा. तिचा उत्साह कमाल होता आणि शेवटपर्यंत तो कुठेही कमी झाला नाही. अशाच सगळ्या भन्नाट लोकांसोबत रात्र कधी उलटून गेली कळलंही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता टेंटमधून बाहेर पडलो तर धुकंच धुकं पसरलं होतं. थंडी अक्षरशः टोचत होती. पण तरीही सर्वजण तयार होऊन बाहेर आले कारण थोड्या वेळातच तारामती शिखर गाठायचं होतं. आम्ही सर्वजण चालू लागलो. कोकणकड्याच्या अतिडावीकडून एक सरळ रस्ता जातो. त्याच रस्त्याला पुढे चालत गेल्यावर डावीकडे एक मोठी गुहा दिसते. पावसाळ्यात तिथून कोसळणारा धबधबा अतिसुंदर दिसतो. तीच पायवाट पुढे चढणीला मिळून जाते आणि तिथून तारामतीचा रस्ता सुरू होतो. धुक्यात हा रस्ता शोधणं थोडं अवघड होतं. पण तरीही वाट काढत ते जंगल पार झालं. वरच्या बाजूला आल्यावर समोर शिडीचं दर्शन झालं. वरच्या पठारावर जाण्याकरता शिडीचा उपयोग केला जात असे. त्या शिड्यांची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. तरीही ती शिडी सगळ्यांनी पार केली. शिडीच्या बाबतीत एका मुलाचा उल्लेख करावा लागेल. तो म्हणजे आमच्या ग्रुपमधला ओम धाडवे. इयत्ता सातवीत असलेला ओम हा मोरया कुटुंबात सगळ्यांत लहान. तरीसुद्धा भीती नावाचा प्रकार त्याने दाखवला नाही. पण शिडी चढताना मात्र ओमचे पाय थरथरू लागले. पण जिद्दीने माघार घेता त्या दोन्ही शिड्या ओमने पार केल्या. ह्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच. साधारण एक - दीड तासात आम्ही तारामती शिखर गाठलं. तारामतीवरून दिसणारा हरिश्चंद्रगड हा शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखा होता. ह्या ट्रेकला सोन्याहून पिवळं करणारी घटना म्हणजे ' इंद्रवज्र '. इंद्रवज्र म्हणजे निसर्गाची अचाट कमाल. जेव्हा काळे ढग आकाशात गर्दी करतात आणि त्या ढगाआडून सूर्यप्रकाशामुळे आपली सावली समोर असलेल्या ढगांवर पडते. तेव्हा आपल्या सावलीभोवती तयार होणारं अर्धवक्रीय इंद्रधनुष्य म्हणजे इंद्रवज्र होय. कोकणकड्यावरून दिसलेलं पहिलं इंद्रवज्र हे सर्वांना दिसू शकलं नाही. कारण ती किमया काही सेकंदापुरतीच होती पण तारामतीवरून चक्क दोन वेळा इंद्रवज्र दिसलं. आमच्यासाठी तो मोठा भाग्याचा क्षण होता. तो क्षण आम्ही कधीच विसरू शकत नाही. 
 तारामती शिखरावर एक शंकराची पिंड आहे. त्यावर एक भगवा झेंडा फडकताना दिसतो. शिखरावर पोहोचताच तिथे महाराजांचा गजर चालू होता. त्यानंतर आम्हीही शिवगर्जना मानवंदना दिली. एकूणच तिथलं वातावरण पाहता प्रसन्न आणि छान वाटत होतं. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये वेळेचं भान सोडून चालणार नव्हतं त्यामुळे आम्ही कोकणकड्याच्या दिशेने उतरू लागलो. नथुबाबाच्या घरी परत आलो. नाश्ता झाला. कोकणकड्याची एक आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढला आणि सामानाची आवराआवर करून नथुबाबाचा निरोप घ्यायला गेलो. २ दिवस अगदी मायेने, आपुलकीने त्याने आम्हाला जेवू घातलं. आम्हाला हवं नको ते सगळं पाहिलं. निघताना बाबाने अक्षय, पारस आणि दुर्गेशला घट्ट मिठी मारली. हे प्रेम सह्याद्रीशिवाय दुसरीकडे कुठेच सापडणार नाही.

 हरिश्चंद्रगड आणि मोरया ट्रेकर्स ह्यांचं एक वेगळं नातं आहे. हरिश्चंद्रगडाने दरवेळेस मोरयाला भरभरून आशीर्वाद दिलेत. तिथे असलेल्या प्रत्येकासोबत एक नातं तयार झालंय. खरंतर माणसं जोडण्याची ताकद सह्याद्रीच आपल्याला देतो. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळताना पडायची भीती ठेवायची नसते. कारण तो भरभक्कम बापाप्रमाणे आपल्या पाठीशी उभा असतो. त्यामुळेच बाकी आयुष्याचं रहाटगाडं फक्त चालू असतं पण सह्याद्री खरं जगायला शिकवतो. त्यामुळेच मनात नसतानाही हरिश्चंद्राचा निरोप घेणं भाग होतं. म्हणून उदरभरण होताच मनात आठवणींची पुंजी जमा करीत आम्ही ९ जूनला दुपारी गडउतार झालो.

                                                                                                                  - जान्हवी फुलवरे.
                                                                                                                     ( मोरया ट्रेकर्स. )

2 comments: