सह्याद्री हे नाव जरी साडेतीन अक्षरांच असलं तरीही ह्याच्या पोटात राकट, अजस्त्र, कणखर असं मोठं साम्राज्य दडलंय. अनेक रानवाटा, दऱ्याखोऱ्या, घाटवळणं अशी बरीच नवलाई सह्याद्रीच्या कुशीत खेळते. ' सांधणदरी ' हे त्यातलंच एक नवल. निसर्गाच्या गर्द राईत दडलेलं ' सांधणदरी ' हे आश्चर्य आजही कित्येकांना माहीत नाही. अहमदनगर जिल्ह्यातल्या साम्रद गावात पुढे दीड - दोन किलोमीटर नागमोडी वळणं घेत जाणारी ही दरी कोणालाही आपल्या प्रेमात पाडल्याशिवाय राहत नाही.
नाशिक - अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर वसलेलं साम्रद हे गाव आणि इथूनच सुरूवात होते आशियातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी दरी असलेल्या सांधणदरीला. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षाची सुरूवातही सांधणच्याच अंगाखांद्यावर करावी असा बेत ठरला. दिवस होता १७ जानेवारी शुक्रवार. नेहमीप्रमाणे रात्री १०.२२ वाजता मुलुंडहून कसारा लोकल पकडली. माझ्यासोबत माझे ४ मित्रही होते. नवीन वर्षातला पहिला ट्रेक म्हणून उत्साह अफाट होता. त्यातही तो ट्रेक सांधण आहे म्हटल्यावर उत्साह द्विगुणित व्हायला वेळ लागला नाही. मजल - दरमजल करत रात्री १२.३० वाजता कसारा स्टेशनला पोहोचलो. सोबत मोरयाचा २७ जणांचा ग्रुप होताच. प्रत्येकाच्या मनातली उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत होती. जास्त वेळ न दवडता आम्ही कसारा स्टेशनवरून बाहेर पडलो. नेहमीप्रमाणे शंकरदादा जीप घेऊन अचूक वेळी, अचूक ठिकाणी आमची वाट पाहत होता. ते म्हणतात ना, सवयीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगाव्या लागत नाहीत तसंच काहीसं शंकरदादाचं याबाबतीत होत असावं. सामानाची नीट बांधाबांध झाली आणि गणपती बाप्पा मोरया!! म्हणत तीनही गाड्या मार्गस्थ झाल्या. गाडी सुरू होता न होताच Bluetooth कनेक्ट केलं आणि गाण्यांच्या तालावर सांधणचा प्रवास सुरू झाला. १० - १५ मिनिटांत बाबाच्या ढाब्यावर पोहोचलो. चहाने काही जणांची झोप उडविली तर काही जणांची स्वप्नं फक्त सांधणदरी अनुभवत होती. चहामुळे जरा तरतरी आलेली. तेव्हा पुन्हा गाड्या साम्रदच्या दिशेने वळू लागल्या. प्रवास साधारण साडेतीन - चार तासांचा होता. एरव्ही दिवसभर थकून घरी येऊन झोपणारी ही डोकी आज मात्र प्रत्येक तालावर सूर धरत होती. खिडकी उघडताच भयानक थंडी अंगावर येत होती पण एकूण वातावरण पाहता छान वाटत होतं. रस्त्यालगतच्या तलावांत चंद्राचं पडलेलं ते अथांग चांदणं निसर्गाच्या किमयेची साक्ष देत होतं. रोजच्या धावपळीत हरवलेली ही शांतता कुठेतरी दिसत असल्याचा आनंद काही वेगळाच.
साधारण साडेतीन वाजता आम्ही साम्रद गावात पोहोचलो. गावच्या कमानीलगत जाणारा सरळ रस्ता तुषार दादाच्या घराकडे घेऊन जातो. जशी पेनासोबत शाई ही येतेच तसंच सांधणचा ट्रेक म्हटल्यावर तुषार दादा हा आलाच. साम्रदसारख्या छोट्याशा गावातही मोरयाच्या प्रत्येक माणसाला हवं नको ते सगळं बघणारा मोरया कुटुंबातला आणखी एक हक्काचा माणूस. त्याच्या घरी पोहोचताच सगळ्यांना आराम करण्यासाठी एक खोली आणि सतरंज्यांची व्यवस्था त्याने करून दिली. पहाटे सहा वाजता ट्रेक सुरू होणार होता त्यामुळे एक तासभर चुटका काढायचा ठरवून सगळे गुडूप झाले. पण त्यातही माझ्यासारखी अजून दोन टाळकी झोपायचं काही नाव घेईनात . त्यामुळे शेकोटी लावायची ठरली. त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची जरा जमवाजमव केली आणि भर थंडीत मी, अक्षय आणि ऋतुराज शेकोटी वर हात शेकत बसलो. थोड्या वेळातच पक्ष्यांच्या किलबिलाटाची चाहूल लागली . पाच वाजतच आले होते. सहज म्हणून तुषारदादाच्या घराकडे डोकावलं तर खमंग पोह्यांचा वास सुटला होता. पहाटेच्या प्रहरी अगदी बोचणाऱ्या थंडीत चहा - पोह्यांचं पोटभर सुख फक्त ट्रेक करतानाच मिळू शकतं. दिवसाची सुरूवातच कमाल झाली होती . सर्वांनी चहा - नाश्ता करून घेतला. दुपारच्या जेवणाकरिता दादाने डबे तयार करून दिले आणि सामानाची आवराआवर करून सर्वजण ट्रेक सुरू करायला सज्ज झालो.
पहाटेचा गारवा, थंड सुटलेला भयंकर वारा, थंडीत गारठून गेलेले हातपाय आणि मनातली सांधणची ओढ असा सगळा गोतावळा एकत्र करून अखेरीस ट्रेकला सुरूवात झाली. हलकंच उजाडायला लागलेलं. दादाच्या घराच्या डावीकडूनच ट्रेकचा रस्ता सुरू होतो. समोर दिसणारा रतनगड आणि रतनगडचा खुटा असं एकंदर दृश्य नजरकैद करून आम्ही चालायला लागलो. जंगलातल्या रस्त्याला सुरूवात झाली. तसा हा रस्ता एकदम सुटसुटीत आणि मोकळा पण अंधार असल्याने जरा दबक्या पावलांनी आम्ही चालू लागलो. थोड्या वेळातच दगडांच्या आकाराची वाढती संख्या बघून जंगल संपत आल्याची जाणीव झाली आणि समोर पाहताच दोन्ही हात पसरून ही सांधणदरी जणू आमच्या स्वागतार्ह उभी होती.
नजरेस पडणारं हे दृश्य कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. एखाद्या लहान मुलाला त्याच्या आवडत्या बागेत घेऊन गेल्यावर आनंदाने हुंदडणाऱ्या त्या बाळासारखी काहीशी अवस्था आमची होती. परंतु सुरूवातीलाच उशीर होऊन चालणार नव्हता. त्यामुळे मनातल्या आनंदाला आवर घालत आम्ही पटापट पावलं उचलायला सुरूवात केली.
सोबत आलेली सर्व मंडळी अचाट उत्साहाने ट्रेक करत होती. कुणीतरी दरीला न्याहाळत होतं तर कुणी समोर दिसेल तो नजारा मोबाईलच्या कप्प्यात साठवून ठेवत होतं. हे ठिकाण आहेच म्हणा तसं. कुणालाही अगदी सहज आपल्या प्रेमात गुंतवून ठेवणारं. साधारण सात वाजत आले होते. थोडं अंतर कापत आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो. समोर असलेला १०० मी. पाण्याचा भाग पार करून पुढचं टोक गाठायचं, असं साधारण ते ठिकाण. भर जानेवारीतल्या त्या कडाक्याच्या थंडीत गळाभर पाण्यात चालून सगळं सामान पलिकडे सुखरूप पोहोचवणं हे काही साहसी खेळापेक्षा कमी नव्हतं. परंतु सगळ्या मुलांनी अर्थातच पुढाकार घेतला. पाण्यात सगळ्या मुलांनी उभं राहून पहिली एक साखळी तयार केली. सगळं सामान आधी पलीकडे नेऊन ठेवायचं असं ठरलं. गारठलेल्या पाण्यात सुन्न झालेले पाय स्थिर ठेवून प्रत्येकाने आपलं सारं बळ पणाला लावलं. मुलींनी एकेक करून सामान द्यायला मदत केली आणि अखेर सर्व मंडळी व्यवस्थित पलीकडल्या टोकावर पोहोचलो. त्यावेळी प्रत्येक मुलाचं मनापासून कौतुक वाटत होतं. कारण काही जणांना अक्षरशः थंडी आणि बधीर झालेलं शरीर अजिबात सहन होत नव्हतं. तरीही प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली. पाण्यातून बाहेर आल्यावर थोडा वेळ तिथेच थांबलो. सगळ्यांना हुडहुडी भरली होती. मात्र पाण्याचा भाग यथोचित पूर्ण केल्याचं समाधान होतं.
नारायणराव आकाशात तांडव घालण्याअगोदर जमेल तितकं, जास्तीत जास्त अंतर पूर्ण करायचं होतं. त्यामुळे वेळेचं भान राखणंही तितकंच गरजेचं होतं. Rappelling Point दिसेपर्यंत आता काही थांबायचं नाही, असं मनाशी पक्कं केलं आणि पायाची गती मुद्दामच वाढवली. पण दूरदूर वर तरी Rappelling point दिसायचं नाव घेईना. सोबत आलेली काही जणं अगदीच नवखी होती. दरी उतरताना इतकं चालण्याचा हा त्यांचा आगळावेगळा पहिलाच अनुभव असावा. त्यात वाटेतल्या प्रत्येक दगडाने एक ठेच देत अगदी नाकीनऊ आणलेल्या आणि वर रविराज घामाच्या धारा पाझरत होते. पण तरीही कुणी हार मानली नाही, हे विशेषच.
शेवटी दुपारी १२च्या सुमारास आम्ही Rappelling Point ला पोहोचलो. साधारण एकूण २८ जणांचा जमाव. त्यात अर्धे अगदी नवखे. त्यामुळे Rappelling Point ची उंची बघून प्रत्येकाच्या मनाने जवळजवळ एक धास्तीच घेतली. पण लगेचच Rappelling चा श्रीगणेशा झाला. दादा प्रत्येकाला कसं उतरायचं हे नीट समजावत होते. सोबतीला आम्हीही होतोच. दिलेला Harness कमरेला घट्ट बांधून आणि डोक्याला हेल्मेट चढवून सारा धीर एकवटवला. मोठ्याने ' गणपती बाप्पा मोरया!! ' अशी आरोळी ठोकली आणि क्षणातच अंगी बळ आल्यासारखं वाटू लागलं. हळूहळू एकेक जण खाली उतरू लागला. धडपडत, ओरडत, थांबत का होईना पण प्रत्येकजण rappelling पूर्ण करत होता. काहीजणं ह्या सगळ्या आठवणी मोबाईलमध्ये बंद करण्यात मग्न होते तर काही जण आपण ही भिंत उतरून खाली आलोय ह्या धक्क्यातून एकमेकांना सावरत होते.
आता मध्यान्ह उलटून गेलेली. अजून अर्धी दरी उतरायची बाकी होती. आकाशात रविराज अक्षरशः आग ओकत होते. हळूच वाऱ्याची झुळूक येऊन चेहऱ्याला स्पर्श करून जात होती तेवढाच काय तो थंडावा. दादाच्या आगामी सांगण्यानुसार साधारण १० मिनिटांवर दुसरा Rappelling Point होता. पण नेहमीप्रमाणे त्या १० मिनिटांनी आम्हाला चांगलं २० - २५ मिनिटं चालवलं. दुसऱ्या Rappelling Point ला पोहोचलो. तिथून उतरताना अंगावर थंडगार पाण्याचा अभिषेक होणार होता आणि ते पाहून अगदी भर दुपारच्या उन्हात थंडी जाणवायला सुरुवात झाली. खाली मदतीसाठी अक्षय आणि दुर्गेश उभे होते. एकेक करून सावकाशपणे त्या दगडांवरून सगळे व्यवस्थित खाली उतरलो. त्या निसरड्या दगडांवरून तोल जाण्याची शक्यता होती परंतु बाप्पाच्या कृपेने असं काहीही झालं नाही. पाण्यातून बाहेर आल्यावर कडकडून भूक लागली. कईक तासांच्या पायपीटीनंतर उदरभरणाची नितांत गरज होती. बस मग ! सांधणच्या त्या भल्यामोठ्या दगडांवर मोरयाची पंगत बसली. मातोश्री मंडळाने दिलेले जेवणाचे डबे उघडले आणि अगदी मनसोक्त ताव मारत पेटपूजा झाली. तासाभराच्या निवांत आरामानंतर पुन्हा मार्गी चालू लागलो. अजूनही दोन Rappelling Patches पुढे आमची वाट पाहत होते. साधारण दुपारचे चार वाजत आलेले. पाय पटापट उतरू लागले कारण ट्रेक संपत आल्याची कुजबूज कानांवर आली. तासाभराच्या अवधीत दोन्ही Rappelling यशस्वीरीत्या पूर्ण झाले आणि सांधणदरीचं शेवटचं टोक समोर अगदी काही अंतरावर दिसू लागलं. आनंद गगनात मावेनासा झाला. चालण्याचा वेग दुपटीने वाढवून आम्ही शेवटच्या टोकाला पोहोचलो. उत्सुकतेने पटकन मागे वळून पाहिलं. अहाहा ! ती अखंड दरी हसतमुखाने आमच्याकडे पाहत असल्यासारखं वाटलं. तिथेच बाजूला दगडांतून थंड पाण्याचे छोटे छोटे झरे वाहत होते. दिवसभराच्या उन्हात रापलेल्या चेहऱ्यावर चटकन पाणी शिंपडलं आणि अशाप्रकारे ट्रेकची सांगता अतिशय गारेगार झाली. मात्र...
ट्रेक जरी संपला असला तरी प्रवास अजून संपला नव्हता. अजूनही campsite गाठायची होती. बऱ्याच जणांनी campsite च्या जागेबाबत बरेच अंदाज बांधले होते. ट्रेक संपल्यावर समोरच आपली campsite असेल ह्या त्यांच्या गोड स्वप्नावर अगदी पाणी फिरलं. त्यांची ती अवस्था बघून मला हसू आवरेना. कसंबसं त्यांना पुन्हा चालायला तयार केलं आणि सामान पाठीवर घेऊन आमचं बिऱ्हाड campsite कडे रवाना झालं. १० - १५ मिनिटांत आम्ही campsite ला पोहोचलो. आमच्या आधी पोहोचलेल्या मंडळींनी तुषार दादासोबत टेंट लावून तयार केले होते. सायंकाळी ६ वाजताची ती वेळ. पश्चिमेला कोवळ्या किरणांची रंगछटा एखादा रंग सांडावा अशी आभाळात पसरलेली. हलकेच थंड वाऱ्याची झुळूक येऊन मन प्रसन्न करत होती. चोहीकडे नजर फिरवता फक्त आणि फक्त उंचच उंच कातळकडे. त्यांच्या मध्यभागी ही गर्द झाडी आणि त्यांच्या कुशीत सामावलेले आम्ही. ट्रेकचा यथासांग शेवट जर असा होणार असेल तर घेतलेल्या कष्टांचा पूर्णपणे विसर पडतो. सर्वांनी आपापलं सामान टेंटमध्ये नेऊन ठेवलं. ताजेतवाने होऊन सगळे एकत्र बसलो. रात्रीच्या शेकोटीची तयारी करायची होती. त्यामुळे काही मुलं लाकडांचा बंदोबस्त करायला गेली. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात झाली. जेवणाला अजून थोडा अवकाश होता. त्यामुळे तोपर्यंत थोडी झोप घेऊया असं म्हणून प्रत्येकजण आपापल्या त्या टुमदार घरात शिरलं. मला तर अगदी क्षणार्धात निद्रादेवी प्रसन्न झाली. तासाभराने कसल्यातरी कुजबुजीने अचानक जाग आली. समजलं की मावशी जेवण तयार असल्याचं सांगायला आलेल्या. तसंही भूक तर लागलीच होती. मावशींनी पानं वाढली आणि मोरयाची सर्व मंडळी साग्रसंगीत पंगतीत जेवायला बसली. चुलीवरचा गरमागरम डाळ भात आणि भाजी हीच कदाचित सुखाची व्याख्या असावी ह्याची सार्थ जाण आम्हांला जेवताना झाली. जेवणं आटोपली आणि पंगत उठली. कारण खरी मजा तर आता सुरू होणार होती. जमा केलेली लाकडं एकत्र रचून ठेवली. त्यात आग पेटवली आणि गप्पांच्या मैफलीला सुरूवात झाली. फोनला नसलेलं नेटवर्क, हळूच गाण्याचा येणारा तो शांत आवाज, आजूबाजूचं थंड वातावरण, शेकोटीमुळे मिळणारी ऊब आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा तो असीम आनंद ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आल्या की ही रात्र संपूच नये, असं पुन्हापुन्हा वाटतं होतं. गप्पा, गाणी, गोष्टी, अनुभव ह्यासोबत सांधणचा पहिला दिवस संपला. वेळ जात होती आणि तसतशी झोपेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे काहीजण टेंटमध्ये जाऊन झोपले. परंतु रसिक मंडळींची ही कमी नव्हती. कोणी चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहण्यात गुंग होतं तर कुणी खरं झालेलं हे स्वप्न जगण्यात गुंतलं होतं. बऱ्याच वेळेनंतर डोळ्यांवर झोपेची झापड येऊ लागली. त्यामुळे वेळेचं भान राखून सगळ्यांनी झोपायचं ठरवलं.
रात्र उलटून गेली. थंडगार वारा सुटल्याने पहाट झाल्याची चाहूल लागली. त्यात ही प्रचंड थंडी. सकाळचे सात वाजत आले होते. त्यामुळे इच्छा नसतानाही हुडहुडत टेंटमधून बाहेर आले. समोर पाहताच अशी सकाळ नेहमी असावी, ही एकच गोष्ट मनात सारखी येत होती. पहाटेचं आल्हाददायक वातावरण आणि सह्याद्रीच्या कुशीत अनुभवायला मिळणारी अशी प्रत्येक सकाळ हा म्हणजे दुग्धशर्करा योगच.
थोड्या वेळात सगळे तयार होऊन बाहेर बसले. चुलीच्या जाळासोबत दरवळत असणारा Maggi चा वास आणि त्यासोबतच बाजूला उकळी घेत असलेला चहा म्हणजे स्वर्गसुखच अहो ! थोड्या वेळात नाश्ता झाला आणि सामानाची बांधाबांध सुरू झाली. सगळं आवरून झालं. त्या जागेची आठवण म्हणून एक ग्रुप फोटो काढला आणि मनात घर करून बसलेल्या ह्या जागेला अखेर निरोप द्यायची वेळ आली. पाय निघतच नव्हता. राहूया ना अजून दोन दिवस खरंच परत जायची इच्छा नाही, कुणीतरी पटकन बोलून गेलं. पण थांबून चालणार कसं ! पुढचा रस्ता आमची वाट पाहतोय. त्यामुळे सामान उचलून आम्ही डेहणे गावची वाट धरली. Campsite पासून तासभर अंतरावर असलेलं. शहापूर तालुक्यातील मधील डेहणे हे गाव. गाव तसं छोटंसंच तरीही अनेक घाटवाटांचा मध्यभाग असलेल्या डेहण्यात आमचा रविवारच्या जेवणाचा मुक्काम होता. मजल दरमजल करत डेहण्याच्या दिशेने चालू लागलो. चालताना आजूबाजूला नजर फिरवली की अनेक सह्यशिखरे आभाळाशी स्पर्धा करताना दिसत होती. वाटेत लिंबू सरबताचा मोह काही आवरता आला नाही. घोटभर लिंबू सरबताने कमालीचा उत्साह वाढला. सगळेजण पुन्हा नव्या जोमाने चालू लागले.
नानांचं घर डोळ्यांसमोर दिसत होतं. डेहण्यातले पाटकर मामा म्हणजेच आमचे नाना. नानांचं घर म्हणजे आपल्या घरासारखंच..... अगदी हक्काचं. तिथे कसलीही औपचारिकता नसते. जिथल्या प्रत्येक हाकेला आपुलकीची जोड असते. मोरयाचा सांधणचा ट्रेक नानांच्या घराशिवाय, तिथल्या मायेशिवाय अपूर्ण आहे. मोरयाचं कुटुंब सह्याद्रीत अशाच माणसांच्या सान्निध्यामुळे वाढतंय. त्यात नानांच्या घरच्या चिकन - भाकरीचा बेत म्हणजे अवर्णनीय गोष्ट. अशी गोष्ट जी फक्त अनुभवणाऱ्यालाच समजू शकते. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता नानांच्या घराच्या दिशेने चालू लागलो. चालताना डाव्या हाताला उभा असलेला आजोबा पर्वत नजरभेट देऊन गेला. गावातली नदी पार केली. गावातली शेतीशिवारं दिसू लागली आणि त्यालगत असलेलं नानांचं कौलारू घरही दृष्टीस पडलं. मी तर धावतंच गेले. ओसरीवर सामान ठेवलं आणि दारात आमचीच वाट पाहत उभ्या असलेल्या नानींना जाऊन भेटले. त्यांच्या त्या एका स्मितहास्याने सारा थकवा पळून गेला. बाकी उरलेली टोळीसुध्दा मागूनच आली. आतल्या खोलीत सामान ठेवलं , पाण्याची तहान भागवली आणि मुलांचा मोर्चा थेट नदीकडे वळला. नदीवर पोहोचताच नदीपात्रात लांबूनच सूर मारला आणि अशाप्रकारे सगळा क्षीण क्षणार्धात नाहीसा झाला. आजूबाजूची गर्द झाडीही तितकीच भुरळ पाडणारी होती. आता सुमारे दीड तास उलटून गेला. कुणीही पाण्यातून बाहेर येण्याचं नाव घेईना. शेवटी भुकेने सर्वांना परतण्यास प्रवृत्त केलं आणि सगळेजण नानांच्या घराकडे परतले. आम्ही मात्र स्वयंपाकघरात बसून नानींशी गप्पा मारत होतो. ह्या सगळ्यात आमचा वेळ कधी निघून गेला, कळलं सुद्धा नाही.
सर्वजण घरी परतल्यावर नानींच्या मुलीने कोकम सरबत आणून दिलं. त्यावर सर्वजण अक्षरशः तुटून पडले. त्या सरबताची चव अजूनही जीभेवर रेंगाळतेय. नदीत मनसोक्त पोहणं झालं. कोकम सरबताने मन तृप्त केलं. आता फक्त आम्ही जेवणाची वाट बघत होतो. तितक्यात नानींनी जेवण झाल्याची हाक दिली. मग काय ! लगेचच पंगत बसली आणि जेवणाची ताटं वाढली गेली. ताटात वाढलेला चिकन - भाकरीचा बेत पाहून झालेला आनंद इथे शब्दांत मांडता येत नाहीये. निवांतपणे एक - दीड तासात सर्वांचं जेवून झालं. परतीच्या प्रवासाच्या गाड्या येऊन उभ्या होत्याच. ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचा आनंद होताच पण तितकीच ट्रेक संपल्याची खंतदेखील होती. सह्याद्रीच्या सान्निध्यात दोन दिवस कसे निघून गेले हे कळलं सुद्धा नाही. नाना - नानींचा निरोप घेताना डोळे किंचित पाणावले. पुन्हा येऊच अशी खात्री देऊन आम्ही निघालो.
ह्या प्रत्येक पायपीटीच्या मुळाशी फक्त एकच प्रश्न येतो, आयुष्यात मिळणाऱ्या सर्व सुखसोयी सोडून घाटवाटांमधलं हे मोकाट भटकणं कशासाठी ? उत्तरं बरीच सापडली परंतु कधी स्पष्ट करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. तसंही ह्या नभमंडपाचं साम्राज्य अफाट. त्याला गवसणी देणारा सह्याद्री हा काही दोन ओळींत मांडण्याचा विषय नाही. त्यामुळेच कदाचित प्रत्येकाने एकदातरी ह्या धुळीत आपले पाय माखवावेत. खरंच हे सह्यकडे रोजच्या धावपळीतलं खरं जगणं वेचून आपल्या ओंजळीत टाकत असतात.
- जान्हवी फुलवरे.
( मोरया ट्रेकर्स. )
Beautiful ❤️
ReplyDeleteThankyou💞keep supporting
Delete😍❤️
ReplyDeleteThankyou💞
Delete