मदनगडाच्या गुहेतली ती उबदार रात्र मात्र कायम स्मरणात राहील. बाहेरच्या वातावरणातला गारवा आम्हांला किंचितही जाणवू न देता स्वत:च्या कुशीत आपल्या लेकराला शांत झोप देणारा हा सह्याद्री नेहमीच ममतेची शाल पांघरून प्रत्येकाला सांभाळतो. ह्याबाबतीत मात्र आपण सारेच भाग्यवान.
साधारण पहाटेची ५.१५ ची वेळ. सूर्योदय होण्यास अजून अवकाश होता. गुहेबाहेर काळाकुट्ट अंधार. अचानक कसल्यातरी हालचालीच्या आवाजाने जाग आली. म्हटलं आता उठलेच आहे तर बाहेर बसावं थोड्यावेळ. त्यामुळे पटकन गुहेबाहेर आले. बाहेर पाऊल ठेवल्याक्षणीच पुन्हा गुहेत स्वेटरसाठी धाव घ्यावी लागली. त्या बोचणाऱ्या थंडीचा मारा काही सहन झाला नाही. तांबडं फुटायला एक तासभर वेळ होती. त्यामुळे तेवढा वेळ मदनच्या माथ्यावर जाऊन बसावं, असं एकसुरात ठरलं. मोजकी २ - ३ जणं उठून बाहेर आली. बाकीच्यांना मात्र त्या बोचऱ्या थंडीत अंगावर पांघरूण ओढून गुडूप झोपून राहण्याचा मोह काही केल्या आवरत नव्हता. आम्ही मात्र पटापट वर चढून माथ्यावर जाऊन बसलो.
वर पोहोचल्यावर अगदी काहीतरी वेगळंच जाणवायला लागलं. आजूबाजूचा संपूर्ण परिसर साखरझोपेत होता. समोर अलंगच्या गुहेतून एखादा दिवा चमकताना दिसू लागला. अगदी अलिप्त अशा गिरीदुर्गांचे सुळकेदेखील पूर्णतः शांत भासत होते. ती आजूबाजूची नीरव शांतता, वाऱ्याची ती मंद झुळूक काहीतरी खुणावत होती. आयुष्य ' जगण्याचा ' खटाटोप कदाचित ह्याकरिताच असावा, असं सांगायचं असेल बहुधा त्यांना. त्या वातावरणाला साजेशी अशी मंत्रमुग्धता चोहोंकडे पसरली. सगळं कसं अगदी अविस्मरणीय आणि सुंदर.
सूर्योदयापूर्वीच नभमंडपाने विविधरंगी शाल अंगावर पांघरली जणू. केशरी, गुलाबी, पिवळा, निळा ह्या सर्व रंगांची उधळण करत सूर्यनारायणाचे आगमन झाले.
संपूर्ण आभाळ तांबूस रंगाने झाकोळलं गेलेलं. ह्याच एकमात्र नजरभेटीसाठी ट्रेक करत इथवर येण्याची धडपड.
सूर्याच्या त्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघालेला संपूर्ण परिसर डोळ्यांत साठवत आम्ही उभे होतो. एकदम स्तब्ध. अगदी निश्चल. कुठलेही दुसरे विचार नाहीत, नाही कुठलंही दुमत. डोळ्यांसमोरचा तो प्रत्येक क्षण मनाच्या कप्प्यात बंद करून घेण्यात आम्ही इतके दंग झालो की वेळेचं भानही राहिलं नाही.
बोलता बोलता घड्याळाची सुई सात वर येऊन पोहोचली. तसंच लगोलग माथ्यावरचं बिऱ्हाड आम्ही गुहेकडे वळवलं. एका बाजूला सामानाची आवराआवर करायला घेतली आणि दुसरीकडे न्याहारीची व्यवस्था सुरू होतीच. चहाचा दरवळ संपूर्ण गुहेत पसरला आणि सोबतीला मॅगी होतीच. नाश्ता करण्यापूर्वी बॅग्स भरून तयार ठेवल्या. मग पोटातल्या भुकेला शांत केलं. न्याहारीची भांडी आवरली आणि अशाप्रकारे साधारण सकाळी साडेआठ वाजता आम्ही मदनगडावरून गडउतार व्हायला सुरूवात केली.
उतरताना पहिले परतीच्या प्रवासासाठी गुहेखालच्या टाक्यांमधून पाण्याची सोय करून घेतली. उन्हं डोक्यावर येण्याआधी कुलंगवर पोहोचायचं होतं. त्यामुळे जास्त वेळ न दवडता मदनगडावरच्या पायऱ्या उतरायला सुरुवात केली. काल ज्या पायऱ्या सरसर चढून वर आलो, आज त्याच पायऱ्या जीव मुठीत धरून सावकाशीने उतरावं लागत होतं. एकावेळी एकच माणूस उभा राहू शकेल इतकी अरुंद जागा आणि बाजूला प्रचंड खोल दरी. बाजूच्या सरळसोट भिंतीचा आधार घेऊनच हळूहळू एकेक पायरी उतरत खाली पोहोचलो. अदल्या दिवशी मदनवरील जी भिंत चढून वर आलो होतो तीच भिंत उतरून कुलंगची पुढची पायवाट गाठायची होती. त्यामुळे harness घातलं आणि पटापट भिंत उतरायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी केलेल्या Climbing आणि Rappelling मुळे आता बऱ्यापैकी आत्मविश्वास आला होता. त्यामुळे न घाबरता दोर हातात घेतला आणि अगदी थोड्याच अवधीत खाली पोहोचलेसुध्दा. मदनवरून कुलंगपर्यंतचं अंतर हे साधारण दोन - अडीच तासांचं. अलंगवरून मदनकडे वळताना वाटेत जे खोपटवजा दुकान दिसतं त्याच दुकानाच्या मागच्या बाजूने जाणारी पायवाट आपल्याला कुलंगकडे घेऊन जाते. पूर्वी मात्र ही वाट अस्तित्वात नव्हती. त्यामुळे खालच्या बाजूने उतरून पूर्ण वळसा घालून कुलंगकडे यावं लागत असे. परंतु सह्याद्रीतील प्रत्येक कातळकडा ज्यांच्या रोमारोमात संचारलेला आहे त्या अरुण सावंत सरांनी नुकतेच काही वर्षांपूर्वी कुलंगकडे कमी वेळात घेऊन जाणाऱ्या ह्या पायवाटेचा शोध लावला असल्याचं अक्षयने सांगितलं. त्यामुळे कुलंगपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सोपा झाला. मनात अरुण सरांचं स्मरण करून आम्ही त्या पायवाटेने चालू लागलो. त्या कपारीलगत मधमाश्यांची पोळी असण्याची शक्यता आहे, असं कैलासदादा सांगू लागला. त्यामुळे जरा दबक्या पावलांनी आजूबाजूला नजर फिरवत चालू लागलो. थोड्याच वेळात आडवाट संपली आणि समोर कुलंगगड व त्याच्या दिशेने जाणारा रस्ता स्पष्ट दिसू लागला. ह्या दोन वाटांना जोडणाऱ्या कच्च्या रस्त्याची माती भुसभुशीत असल्याने निसरड्या वाटेवर तग धरणं थोडं कठीण झालं. म्हणूनच मी आनंदाने पडत, धडपडत त्या निसरड्या वाटेवरून खाली उतरले आणि आम्ही सर्वजण कुलंगपाशी पोहोचलो. असं असलं तरीही माथ्यावर पोहोचायला मात्र बराच अवकाश होता. कारवीच्या त्या गर्द झाडीतून रस्ता काढत आम्ही मार्गस्थ झालो. अलंग आणि मदन ह्यांच्या तुलनेने कुलंगच्या पायवाटेने फार घाम काढला. पायवाट काही केल्या संपेना. त्यात डोक्यावर रविराजाचा तांडव. घसा कोरडा पडू लागला. कधी एकदा खांद्यावरचं सामान बाजूला ठेवून दगडाला पाठ टेकवतोय, असं झालेलं. अखेर पायवाट संपली आणि नजरेसमोर कुलंगच्या माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसू लागल्या. पण त्याआधी नजर लिंबू सरबतावर खिळली. एवढ्या भर उन्हात ह्या लिंबू सरबताने मात्र कमालीचा थंडावा दिला. क्षणभर तिथेच बसलो आणि मग पायांची चाकं पायऱ्यांच्या दिशेने वळवली. बाकी दोन्ही गडांच्या तुलनेत ह्या पायऱ्या तशा बऱ्याच रुंद आणि उंच. पायऱ्यांकडे जाताना मध्ये पुन्हा एक छोटी पायवाट लागते.
त्या वाटेवर डाव्या बाजूला तोंड करून उभे राहिले की कळसूबाई आणि किरडा ही गिरीशिखरे दर्शन देतात. लवकरात लवकर कुलंगचा माथा सर करायचा होता. त्यामुळे पावलांची गती थोडी वाढवली.
ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या बघून गोरखगडाची आठवण आली. आजूबाजूचा परिसर एव्हाना स्पष्ट दिसू लागला. समोरचं टुमदार आंबेवाडी गाव आणि त्यालाच बिलगून असलेलं भारवाज धरण नजरेच्या खेपेत येईल, इतकं सुस्पष्ट दिसत होतं. ह्या कातळकोरीव पायऱ्यांलगत बाजूला छोट्या गुहादेखील कोरलेल्या आहेत. ह्या गुहांचा वापर विश्रामासाठी केला जातो, असे त्यावरून दिसून येते. गडावरून उतरणाऱ्या माणसांनी समोरच्या पायरीकडे बोट दाखवत गडमाथा समोरच असल्याचं सांगितलं. हे ऐकताच पायांचा वेग दुपटीने वाढला. तितक्यात..
तितक्यात लक्ष एका चौकटीकडे गेलं. ती चौकट घुबडाच्या आकारासारखी भासत होती. हीच ती कुलंगवरील सुप्रसिद्ध घुबड चौकट असल्याचं लक्षात आलं. पटकन मोबाईल काढून त्या फ्रेमला चित्रबद्ध केलं. अखेर आम्ही सगळे कुलंगच्या माथ्यावर पोहोचलो. आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु घशाला आत्यंतिक कोरड पडली होती. त्यामुळे आम्ही आमचा मोर्चा कुलंगच्या माथ्यावर डाव्या बाजूला असलेल्या टाक्यांकडे वळवला. तीनही गडांपैकी सर्वाधिक पाण्याच्या टाक्या कुलंगगडावर आढळतात. टाक्यांशेजारी बसून मनसोक्त थंडगार पाणी प्यायलो. त्या सर्व टाक्यांच्या मधोमध महादेवाची एक छोटी मूर्ती ठेवलेली आहे.
त्या महादेवाला मनोमन नमस्कार केला आणि कुलंगचा माथा पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. थोडं पुढे चालत गेल्यानंतर पुन्हा एक टाक्यांचा समूह दृष्टीस पडला आणि त्याशेजारी मात्र भलंमोठं धरणवजा बांधकाम नजरेस पडलं. पुरातन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेलं ते बांधकाम पाहून आम्ही थक्क झालो. तेथूनच समोरच्या दिशेला नजर टाकली तर ऐटीत उभा असलेला छोटा कुलंग दिसतो. ही सगळी विशाल सुंदरता नजरेत सामावून घेण्याकरिता क्षण अपुरे पडत होते.
त्या टाक्यांच्या बाजूने वरच्या बाजूस चालताना एक मोठं पठार दिसलं. हाच कुलंगचा सर्वोच्च माथा. बरीच पायपीट झाली असल्याने जरावेळ तिथेच विसावलो. तिथून समोर दिसणारं दृश्य पाहून आलेला थकवा पळून गेला. अगदी समोर नजरेच्या टप्प्यात दिसणारे अलंग, मदन, किरडा, साकिरा आणि कळसूबाई. तर एका बाजूस अनेक सुळके रांगेत एका मागोमाग एक उभे होते.
आकाशाला गवसणी घालणाऱ्या अग्निबाणांप्रमाणे भासणारे हे सुळके पाहून सह्याद्रीच्या अजस्त्रतेची सार्थ जाणीव झाली. थोडा वेळ तिथेच बसलो. गप्पा मारत बराच वेळ निघून गेला. पण नंतर मात्र पोटातल्या भुकेने हजेरी लावायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही माथ्यावरून खाली उतरू लागलो. पटापट पायऱ्या उतरून खाली कारवीच्या पायवाटेपाशी आलो. कैलास दादा आमचीच वाट पाहत होता. त्याला पुढे उतरण्याचा रस्ता विचारला असता त्याने हाच कारवीच्या झाडीतून जाणारा रस्ता पुढे जंगलात जाऊन मिळतो, असं सांगितलं. अजून दुपारचं जेवणदेखील बाकी होतं. त्यामुळे झाडी मधून रस्ता काढत जंगलातल्या वाटेला लागलो. उन्हाने अक्षरशः घामाच्या धारा काढल्या आणि आता थकवाही जाणवू लागला. पोटात भुकेने आग पडलेली आणि तितक्यात आम्ही जंगलात एका ठिकाणी येऊन पोहोचलो. झाडांची गर्द सावली, सपाट जमीन आणि बाजूला पाण्याचं एक छोटं डबकं ह्या सर्व गोष्टी पाहून दुपारच्या जेवणाची सोय येथेच करू, असं कैलास दादा म्हणाला. तेवढ्यात बाकी सगळेजणही तेथे आले. मुलांनी चुलीसाठी लाकडं शोधली आणि त्यावर भाताचं आधण ठेवलं. दुपारच्या जेवणासाठी पुलाव - लोणचं - पापड असा बेत होता. तोपर्यंत आम्ही जेवणाचं सामान काढून ठेवलं. भाज्यांचीसुध्दा तयारी झाली. रितीप्रमाणे यावेळीही शंकरने जेवणाची जबाबदारी घेतली. कैलास दादाही त्याच्या मदतीला होता. पण नाही म्हटलं तरीही जेवणाला अजून अवकाश होता. पण तोपर्यंत ह्या पोटातल्या भुकेला शांत ठेवावं तरी कसं ? हा मोठा यक्षप्रश्न. मात्र त्यावरही अक्षयने उपाय शोधला. जेवण होईपर्यंत कांदा - टोमॅटो मारून मस्त भेळेचा बेत करूया, असं तो पटकन बोलून गेला. लगेच सगळं सामान काढलं आणि पाच मिनिटांत भेळ तयार झालीसुध्दा.
अहाहा ! काय ती चव ! ' मला सांगा सुख म्हणजे काय असतं ' तर ते हे !! भेळेवर दोन्ही हात साफ करून घेतले. अगदी सफाचाट ताव मारला राव. तेव्हा जरा हायसं वाटलं. डोक्यावर झाडांची सावली, दुपारचा आल्हाददायक वारा आणि चुलीवर शिजत असलेल्या जेवणाचा दरवळ अशी एकंदरीत सारी सुग्रास परिस्थिती होती. थोड्यावेळाने पातेलं चुलीवरून खाली उतरवलं आणि जेवणाची पानं वाढली.
पंगतीत प्रत्येकाने पुढ्यात वाढलेल्या चविष्ट अन्नावर मनसोक्त ताव मारला. उदरभरण होताच सामानाची पुन्हा आवराआवर केली. बॅग पाठीवर टाकली. त्या सुंदर जागेला निरोप देत पुढचं राहिलेलं जंगल पार करायला सुरूवात केली. जेवण झाल्याने एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. चालता चालता बऱ्याच गप्पादेखील रंगल्या. दोन दिवस केलेली मजा आणि ट्रेक संपत आल्याची खंत अशी द्विधा मनस्थिती झाली होती. प्रत्येकाचीच.
बोलता बोलता पायथ्याशी केव्हा पोहोचलो कळलंदेखील नाही. अखेरीस बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा असलेला AMK अर्थातच अलंग - मदन - कुलंग ट्रेक येथे यथोचित पूर्ण झाला. सर्वप्रथम कैलासदादाचे मनापासून आभार मानले.
त्याने केलेल्या मदतीसाठी, दिलेल्या आत्मविश्वासासाठी आणि दाखवलेल्या आपुलकीसाठी खरंतर ' आभार ' हा शब्द फार तोकडा आहे. ह्याच सह्याद्रीतली ही माणसं आणि त्यांनी वेळोवेळी दिलेल्या ह्या प्रेमळ वागणुकीमुळेच सह्याद्री कधी परका वाटत नाही. आज ह्या दोन दिवसांच्या पायपीटीनंतर अनेक नवीन गोष्टी समजल्या. नवीन वाटा पायाखाली तुडवत नवे अनुभवविश्र्व पाहिले. प्रत्येक नव्या वळणावर सह्याद्रीचा नवा पैलू उलगडत गेला आणि म्हणूनच अलंग - मदन - कुलंग ह्या दुर्गत्रिकुटाची वारी अविस्मरणीय ठरली.
अशाप्रकारे आठवड्याचे सहा दिवस लोकलच्या धावपळीत घामांच्या धारांत चिंब झालेल्या भटक्यांची सह्याद्रीकडे वळलेली पाऊलं मोकळा वारा पिऊन, ताजेतवाने होऊन पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना झाली.
छायाचित्रे साभार : अक्षय पाठारी व दुर्गेश चेंदवणकर.
- जान्हवी फुलवरे.
[ मोरया ट्रेकर्स ]